आझाद हिंद सेना : UPSC परीक्षेसाठी उपयुक्त
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची चळवळ ही अनेक वीरांच्या शौर्याने आणि त्यागाने भरलेली आहे. त्यातीलच एक नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि त्यांनी स्थापलेली आझाद हिंद सेना. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला हा लढा म्हणजे स्वातंत्र्यासाठीच्या धैर्याची आणि जिद्दीची एक गाथा असून त्यामधून लाखो-करोडो भारतवासीयांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेण्याची प्रेरणा मिळाली. आज या लेखात आपण MPSC/UPSC परीक्षांसाठी आझाद हिंद सेना,आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली? नेताजी सुभाषचंद्र बोस,रासबिहारी बोस,आझाद हिंद सरकार आणि भारतीय स्वातंत्र्य लढा यांनी कसा इतिहास घडवला याविषयीची सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत !
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांंनी केलेला स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा अद्भूत असा संघर्ष
- भारताला जुलमी ब्रिटीश राजसत्तेपासून स्वातंत्र्य मिळण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इतर अनेक नेत्यांप्रमाणेच अभूतपूर्व प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात.
- भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांच्या विरोधात युद्ध करण्यास सज्ज झाले होते. हे सर्व सैनिक आझाद हिंद सेनेचे होते.
- आझाद हिंद सेनेच्या सैनिकांचे नेते नेताजी होते.
- नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. त्यांनी एकूण दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे–
1. १९३८ चे हरिपुर येथील अधिवेशन : प्रथमच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद.
2. १९३९ चे त्रिपुरी येथील अधिवेशन : त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड.
- मात्र,दुसऱ्या वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे महात्मा गांधींजी गटाशी मतभेद झालेले आपल्याला पहावयास मिळतात.
- त्यामुळे सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन ‘फॉरवर्ड ब्लॉक’ हा पक्ष स्थापला.
- 'फॉरवर्ड ब्लॉक' - आपले विचार जनतेसमोर मांडण्याचा नेताजींचा मंच होता.
- भारतामध्ये ब्रिटिश राजवटीविरुद्ध तीव्र आंदोलनाची गरज आहे असा विश्वास नेताजींचा होता.
ते आपल्या भाषणांतून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीय जनतेला करत असताना सरकारने त्यांना बंदिवासाची शिक्षा सुनावली. तसेच तुरुंगामध्ये त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाकडून त्यांची मुक्तता करण्यात आली व त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले गेले. तेथूनही वेषांतर करून आपली सुटका करून घेऊन १९४१ साली एप्रिल महिन्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जर्मनीला रवाना झाले. तिथे त्यांच्याकडून ‘फ्री इंडिया सेंटरची’ स्थापना करण्यात आली. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ हया केंद्रावरून भारत स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले. त्याच कालावधीदरम्यान रासबिहारी बोस हयांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जपानला येण्याचे निमंत्रण पाठविले.
आझाद हिंद सेनेची स्थापना कशी झाली ? तिच्या स्थापनेमागील प्रमुख पायऱ्या कोणत्या ?
आझाद हिंद सेनेची स्थापना कधी झाली? रासबिहारी बोस हे १९१५ पासूनच जपानला वास्तव्यास होते. आग्नेय आशियातील देशभक्त भारतीय लोकांना संघटित करून त्यांनी 'इंडियन इंडिपेंडन्स लीग' ही संघटना स्थापन केली. १९४२ च्या पूर्वार्धात जपानने आग्नेय आशियातील ब्रिटिशांच्या ताब्यात असलेले प्रदेश जिंकून घेतले व तिथे असणाऱ्या ब्रिटिश सैन्यात हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या तावडीत सापडले. आझाद हिंद सेनेच्या स्थापनेमागील पुढील पायऱ्या:
कॅप्टन मोहनसिंग यांच्या मदतीने, युद्धबंदी झालेल्या भारतीय सैनिकांची एक पलटण रासबिहारी बोस यांनी तयार केली व त्या पलटणीचे नामांतरण 'आझाद हिंद सेना' असे केले गेले.
त्यानंतर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले गेले.
१९४३ च्या ऑक्टोबर महिन्यात नेताजींनी सिंगापूरला आझाद हिंद सरकारची स्थापना केली.
त्यांचे प्रमुख सहकारी:
1. शहानवाझ खान
2. जगन्नाथ भोसले
3. डॉ. लक्ष्मी स्वामीनाथन
4. गुरूबक्षसिंग धिल्लाँ
5. प्रेमकुमार सेहगल
कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन, झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या.
भारतीय जनतेला नेताजींकडून 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूँगा।' असे आवाहन केले गेले.
पराक्रम
नोव्हेंबर १९४३ मध्ये जपानने अंदमान व निकोबार ही दोन्ही बेटे जिंकून घेऊन ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
नेताजींनी अंदमान व निकोबार बेटांना अनुक्रमे 'शहीद' व 'स्वराज्य' ही नावे दिली.
१९४४ मध्ये, आझाद हिंद सेना, हिच्याकडून म्यानमारमधील आराकानचा प्रदेश ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकून घेण्यात आली.
जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने आझाद हिंद सेनेची इम्फाळ मोहीम अर्धवट राहिली. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीतदेखील सैनिक अतिशय नेटाने व धाडसाने लढत असतानाच जपानने शरणागती पत्करली. त्यानंतर, १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे दुर्दैवी निधन झाले. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेच्या लढ्याचे एक रोमहर्षक पर्व संपुष्टात आले. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारकडून राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला.
आझाद हिंद सेनेतील अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणारे निष्णात कायदेपंडित नेते खाली दिलेले आहेत:
(MPSC/UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती)
1.पंडित जवाहरलाल नेहरू
2. तेजबहादूर सप्रू
3. भुलाभाई देसाई
मात्र लष्करी न्यायालयाने आझाद हिंद सेना अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा परिणाम म्हणून भारतीय जनतेत ब्रिटिश शासनाविरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरीस लष्करी न्यायालयाने दिलेल्या शिक्षा सरकारला रद्द कराव्या लागल्या.
Subscribe Our Channel