इस्लामिक सहकार्य संघटना (Organization of Islamic Cooperation - OIC)
अलीकडे इस्लामिक सहकार्य संघटनेने (OIC) इराण, सीरिया आणि लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून, आंतरराष्ट्रीय समुदायाने त्वरित आणि ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
इस्लामिक सहकार्य संघटना (OIC) बद्दल माहिती:
स्थापना: OIC ची औपचारिक स्थापना मे 1971 मध्ये सौदी अरेबियातील जेद्दा येथे झाली. याआधी 1969 मध्ये मोरोक्कोतील रबात येथे अल-अक्सा मशिदीवर झालेल्या जाळपोळीनंतर एक विशेष शिखर परिषद झाली आणि त्यानंतर 1970 मध्ये मुस्लिम परराष्ट्र मंत्र्यांची बैठक जेद्दामध्ये झाली, ज्याच्या परिणामी OIC ची निर्मिती झाली.
सदस्यसंख्या: OIC मध्ये चार खंडांतील एकूण 57 देश सदस्य आहेत. संयुक्त राष्ट्रसंघानंतर ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरशासकीय संघटना आहे.
सदस्य देशांमध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तुर्की आणि पॅलेस्टिनी प्राधिकरण यांचा समावेश होतो.
- सीरियाला 2012 पासून सुरू असलेल्या यादवी युद्धामुळे सदस्यत्वातून निलंबित करण्यात आले आहे.
- इजिप्तला 1979 मध्ये कॅम्प डेव्हिड करारामुळे निलंबित करण्यात आले होते, पण ती 1984 मध्ये पुन्हा सदस्य बनली.
मुख्यालय: जेद्दा, सौदी अरेबिया
अधिकृत भाषा:अरबी, इंग्रजी आणि फ्रेंच
महत्त्वाची प्रशासकीय रचना:
- इस्लामिक शिखर परिषद (Islamic Summit Conference - ISC): OIC च्या धोरणनिर्मितीसाठी सर्वोच्च प्राधिकरण. दर तीन वर्षांनी भरते.
- परराष्ट्र मंत्र्यांची परिषद (Council of Foreign Ministers - CFM): दरवर्षी भरते. शिखर परिषदेत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व सहकार्याची दिशा ठरवते.
- सामान्य सचिवालय (General Secretariat): कार्यकारी संस्था. निर्णयांची अंमलबजावणी आणि सदस्य देशांमधील समन्वय साधते.
- मंत्रीस्तरीय समित्या (Ministerial Committees): राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक सहकार्याकरिता स्थापन. काही समित्यांचे अध्यक्ष सदस्य राष्ट्रांचे प्रमुख असतात.
OIC च्या मुख्य उपक्रम व संस्था:
- इस्लामिक विकास बँक (Islamic Development Bank - IsDB): आर्थिक विकास व सामाजिक प्रगतीसाठी कार्यरत.
- इस्लामिक एकता निधी (Islamic Solidarity Fund - ISF): मानवीय व विकासात्मक प्रकल्पांना आर्थिक मदत पुरवतो.
- आंतरराष्ट्रीय इस्लामिक वृत्तसंस्था (International Islamic News Agency - IINA): इस्लाम व मुस्लिमांच्या जागतिक प्रतिमेच्या संवर्धनासाठी कार्य करते.
- इस्लामिक शिक्षणासाठी जागतिक केंद्र (World Centre for Islamic Education): इस्लामिक मूल्ये आणि विज्ञानावर आधारित शिक्षण प्रसारासाठी समर्पित.
OIC चे जागतिक सहकार्य:
OIC विविध संयुक्त राष्ट्र संस्था, सरकारी यंत्रणा, व नागरिक समाज संस्था (CSOs) यांच्यासोबत मुस्लिम राष्ट्रांवरील व जागतिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी सहकार्य करते.
Subscribe Our Channel