भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये तब्बल ₹2.69 लाख कोटींचा ऐतिहासिक अधिशेष नोंदवला आहे. ही केंद्र सरकारला मिळालेली सर्वात मोठी लाभांश रक्कम आहे.
RBI लाभांश म्हणजे काय?
RBI लाभांश म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून केंद्र सरकारकडे हस्तांतरित केला जाणारा वार्षिक नफा किंवा अधिशेष होय.
- हा अधिशेष RBI च्या विविध आर्थिक व्यवहारांमधून मिळतो.
- तो Economic Capital Framework (ECF) या नियामक पद्धतीअंतर्गत केंद्र सरकारला हस्तांतरित केला जातो.
- हा कर नसून केंद्र सरकारसाठी अकरात्मक महसूल (Non-Tax Revenue) आहे.
- याचा उपयोग सरकार आपला राजकोषीय तुटीचा ताळमेळ घालण्यासाठी आणि खर्च भागवण्यासाठी करते.
- ही रक्कम हस्तांतरित करण्याआधी RBI Contingent Risk Buffer (CRB) द्वारे भविष्यातील जोखमींसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी काही रक्कम राखून ठेवते.
2024-25 मध्ये RBI चा अधिशेष इतका जास्त का झाला?
- उच्च व्याज उत्पन्न: RBI ला देशांतर्गत आणि विदेशी सरकारी रोखे (bonds, T-bills) यावर मिळणाऱ्या व्याजातून भरपूर उत्पन्न मिळते. FY25 मध्ये जागतिक स्तरावर व्याजदर वाढल्यामुळे या रोख्यांवर अधिक परतावा मिळाला.
- परकीय चलन व्यवहारातून नफा: जानेवारी 2025 मध्ये RBI आशियातील सर्वात मोठा डॉलर विक्रेता ठरला. परकीय चलन बाजारातील चढ-उतारामुळे डॉलर विक्रीतून चांगला नफा मिळाला.
- सोन्याच्या साठ्यात वाढ आणि दरवाढीचा फायदा: RBI ने आपले सोन्याचे साठे वाढवले असून, जागतिक बाजारात सोन्याचे दर वधारल्याने त्यातून भांडवली लाभ (Capital Gains) झाले.
- तरलता व्यवस्थापन व LAF व्यवहार: RBI ला बँकांसोबतच्या रेपो व रिव्हर्स रेपो व्यवहारांमधून मिळणाऱ्या व्याजातूनही महसूल मिळतो. बाजारातील अस्थिरतेदरम्यान केलेल्या सक्रिय तरलता व्यवस्थापनामुळे या उत्पन्नात वाढ झाली.
- चलन मुद्रणातून उत्पन्न (Seigniorage): RBI ला चलन छपाईच्या खर्चापेक्षा चलनाच्या मूल्यावरून मिळणारा फरक हा नफा स्वरूपात मिळतो.
- कार्यक्षम खर्च व्यवस्थापन: RBI ने आपले ऑपरेशनल खर्च कुशलतेने हाताळले. त्यामुळे एकूण उत्पन्नाचा मोठा भाग निव्वळ अधिशेषात रूपांतरित होऊ शकला.
Subscribe Our Channel